12 Jun 2020 Current affairs in marathi(chalu ghadamodi )
जागतिक बालकामगार निषेध दिन

चालू घडामोडी 12 जून 


हैदराबाद आयआयटीकडून करोना चाचणी संच विकसित


हैदराबाद येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) कोविड 19 चाचणी संच विकसित केला असून या किफायतशीर संचाच्या मदतीने वीस मिनिटांत चाचणी करता येते.

 संशोधकांनी असा दावा केला, की ही पर्यायी चाचणी पद्धत रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन (आरटी-पीसीआर) पद्धतीपेक्षा वेगळी आहे. या संचाची किंमत 550 रुपये असून ती जास्त उत्पादनानंतर साडेतीनशे रुपयांपर्यंत खाली आणता येईल.

 या संचासाठी पेटंट घेण्यात येणार असून इएसआयआयसी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या हैदराबादच्या संस्थेत त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.या संचाला मान्यता मिळण्यासाठी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे अर्ज करण्यात आला  आहे. 

या चाचणी संचांच्या मदतीने वीस मिनिटांत निकाल हाती येतो. त्यात लक्षणे असलेल्या व नसलेल्या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची चाचणी करता येते, अशी माहिती हैदराबाद आयआयटीचे प्राध्यापक शिव गोविंद सिंह यांनी दिली. हा कमी किमतीचा संच असून कुठेही सहज नेता येतो.

यातील चाचणी पद्धत वेगळी असून त्यात कोविड 19 जनुक आराखडय़ातील विशिष्ट भागाच्या क्रमवारीचा आधार घेण्यात आला आहे. आयआयटी दिल्लीने त्यांच्या पीसीआर आधारित चाचणी संचाला आयसीएमआरकडून मान्यता घेतली आहे.

 हैदराबाद आयआयटी संस्थेने असा दावा केला, की सध्याच्या चाचणी प्रक्रिया या शोध प्रक्रियेवर आधारित आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली चाचणी ही शोध आधारित नसल्याने त्याची किंमत कमी आहे शिवाय त्यात अचूकतेशी तडजोड करण्यात आलेली नाही.

जागतिक बँकेचा “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट: जून 2020” अहवाल


जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट” या शीर्षकाच्या अहवालाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे.

अहवालानुसार 


2020-21 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 3.2 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.

महामारीमुळे झालेल्या नुकसानामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 5.2 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे. महामारीमुळे उद्भवलेली मंदी ही 1870 सालानंतर पहिल्यांदाच पाहिली गेली आहे.

2020 साली महामारीमुळे देशांतर्गत मागणी व पुरवठा, व्यापार आणि वित्तपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक क्रियाकलापांमध्ये सात टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.

2020-21 या आर्थिक वर्षात उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्था 2.5 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे, जे की गेल्या 60 वर्षांत प्रथमच पाहिले गेले आहे.
दरडोई उत्पन्नात 3.6 टक्क्यांनी घट होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे यावर्षी कोट्यवधी लोक अत्यंत दारिद्र्यात ढकलले जाणार आहेत.

सध्याच्या अंदाजानुसार महामारीच्या मंदीमुळे जागतिक दरडोई GDP मध्ये 6.2 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.

जागतिक व्यापार, पर्यटन, वस्तूंच्या निर्यातीवर आणि बाह्य वित्तपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणाऱ्या देशांना महामारीचा सर्वात मोठा फटका बसत आहे.

वर्ष 1870 नंतर 1876, 1885, 1893, 1908, 1914, 1917-21, 1930-32, 1938, 1945-46, 1975, 1982, 1991, 2009 आणि 2020 या वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेने 14 वेळा जागतिक मंदी अनुभवली आहे.

राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी


राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (एनआयआरएफ) सर्वसाधारण आणि विद्यापीठ या दोन्ही गटात महाराष्ट्राला द्वितीय स्थान मिळाले आहे.

क्रमवारीतील पहिल्या शंभर संस्थांमध्ये सर्वसाधारण गटात राज्यातील 12 संस्था आणि विद्यापीठ गटात 13 संस्थांचा समावेश आहे.

शैक्षणिक संस्थांमधील अध्ययन-अध्यापन, सोयीसुविधा, संशोधन, विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या रोजगारसंधी, एकूण दृष्टिकोन आदी निकषांवरील संस्थांची कामगिरी विचारात घेऊन ही क्रमवारी जाहीर करण्यात येते.

सर्वसाधारण गटात महाराष्ट्रातील आयआयटी बॉम्बे (4), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (19), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (25), होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट मुंबई (30), इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (34), टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (57), सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, पुणे (73), डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे (75), नरसी मूनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (92), मुंबई विद्यापीठ (95), दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा (97), भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे (98) या संस्थांचा समावेश आहे.

Johnson & Johnson कंपनी ने करोना व्हायरसवर लस शोधल्याचा दावा केला


करोना व्हायरसवर औषध शोधण्याचे जगभरातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशातच प्रसिद्ध कंपनी Johnson & Johnson ने करोना व्हायरसवर लस (व्हॅक्सिन) शोधल्याचा दावा केला असून या व्हॅक्सिनच्या आतापर्यंतच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

या व्हॅक्सिनची आता मानवावर चाचणी घेण्यास सुरूवात करणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

कंपनी जुलै महिन्यामध्ये माणसावर या व्हॅक्सिनच्या चाचणीला सुरूवात करणार आहे.

त्याआधीच अमेरिकेने Johnson & Johnson सोबत या व्हॅक्सिनसाठी करार केला आहे. या करारानुसार कंपनी अमेरिकेसाठी या व्हॅक्सिनचे 1 बिलियन डोस तयार करणार आहे.

कंपनी हा प्रयोग अमेरिका आणि बेल्जियममध्ये करणार आहे. यासाठी कंपनीने 18 ते 65 या वयोगटातील 1,045 जणांची निवड केली आहे. वृद्धांवर हे व्हॅक्सिन परिणामकारक आहे की नाही हे तपासण्यासाठी 1045 जणांमध्ये काही 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडिया साठी 11 जून 1975 हा दिवस खास का ?

टीम इंडियाने आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात एकूण तीन वेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे.

1983 साली भारताने कपिल देवच्या नेतृत्वाखाली वन डे विश्वचषक उंचावला.

तर त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 ला टी 20 विश्वचषक आणि 2011 साली दुसरा वन डे विश्वचषकावर भारताने नाव कोरले.

हे तीनही दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.पण त्याचसोबत 11 जून 1975 या दिवसाला भारतीय क्रिकेटमध्ये खास महत्त्व आहे.

1975 मध्ये पहिल्यावहिल्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेआधी भारताने 1974 मध्ये इंग्लंडविरुद्द दोन वन डे सामने खेळले होते.

श्रीनिवासराघवन व्यंकटराघवन यांच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला होता.


सरकारचे शेतकऱ्यांसाठी 4 महत्त्वाचे निर्णय – मोदी


देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या  दारी समृद्धी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चार मोठे निर्णय घेतले आहेत.

हे निर्णय भविष्यात इतिहास बनतील, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे.

तोमर यांनी सांगितले की, या चार निर्णयांनुसार, शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या परतफेडीचा कार्यकाल वाढविण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या पिकांच्या आधारभूत किमती वाढविण्यात आल्या आहेत.

तोमर यांनी म्हटले की, कृषी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (संवर्धन व सुलभीकरण) अध्यादेश 2020 आणि शेतकरी सशक्तीकरण व संरक्षण अध्यादेश 2020 असे दोन अध्यादेश सरकारने जारी केले आहेत.

पहिल्या अध्यादेशामुळे शेतकरी आता आपली उत्पादने देशात कोठेही विकू शकतील.

दुसऱ्या अध्यादेशानुसार, शेतकरी आणि प्रायोजक यांच्यात करार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकरी उभ्या पिकाचा विक्री करार करू शकेल.

अल्पकालीन कृषी कर्जांची परतफेडीची कालमर्यादा 31 ओगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जून रोजी घेतला.

देशातील नव्या शैक्षणिक धोरणानुसार क्रीडा विषयाचा समावेश


देशातील नव्या शैक्षणिक धोरणानुसार क्रीडा विषय हा आता नियमित अभ्यासक्रमाचा भाग असेल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षणावर आयोजित करण्यात आलेल्या एका वेबसंवादामध्ये रिजिजू यांनी त्यांचे मत मांडले. ‘‘खेळाकडे पर्यायी विषय म्हणून पाहणे चुकीचे आहे.

देशातील नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता खेळ हा विषयसुद्धा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असेल,’’ असे ४८ वर्षीय रिजिजू म्हणाले.

देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी यासंबंधी जवळपास अंतिम निर्णय झाला आहे. क्रीडा मंत्रिमंडळातील सर्व सभासदांनी खेळाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याविषयी पुढाकार घेतल्याने हे शक्य झाले,’’ असेही रिजिजू यांनी सांगितले.

दिनविशेष 12 जून 


12 जून – घटना


1896 : जे.टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात 100 बळी घेणारा पहिला खेळाडू झाला.
1898 : फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
1905: गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक...

12 जून – जन्म


1894 : बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 1991)
1917 : लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म.

12 जून – मृत्यू


1964 : मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: 5 जानेवारी 1892 - इस्लामपूर, सांगली)
1978: चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार गुओ मोरुओ यांचे निधन.


Must Read (नक्की वाचा)
चालू घडामोडी 11 जून 2020


Follow on Instagram

join telegram channel 

credit by:- स्त्रोत -PIB,The Hindu ,Times of India,Indian Express,BCC मराठी,लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post